👇।।श्री गुरुचरित्र अध्याय पहिला ।।


।।ॐ।। श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्रीपाद श्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-स्वामी महाराजाय नमः । ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरीजाकुमरा । जयजय लंबोदरा । एकदंता शुर्पकर्णा ।।१ ।। तुझे जे चिंतन करिती । तयां विघ्ने न बाधती । सकळाभीष्टे साधती । अविलंबेसी ।।२ ।।सकल मंगल कार्यासी ।प्रथम वंदिजे तुम्हांसी । चतुर्दश विद्यांसी ।स्वामी तूचि लंबोदरा ।।३ ।। हरि ब्रम्हाादिक गणपती । कार्यारंभी वंदीती । सकळाभीष्टे साधती । तुझेनि  प्रसादे ।।४ ।। समस्त गणांचा नायक ।  तूचि विघ्नांचा अंतक ।  तूते वंदिती जे लोक ।  कार्य साधे तयांचे ।।५।। माझे मनीची वासना । तुवा पुरवावी गजानना । साष्टांग करितो नमना । विद्या देई मज आता ।।६।। नेणता होतो मतिहीन । म्हणोनि धरिले तुझे चरण । चौदा विद्यांचे निधान । शरणागतवरप्रदा ।।७।। माझे अंत:करणीचे व्हावे । गुरुचरित्र कथन करावे । पूर्णदृष्टीने पहावे । ग्रंथसिद्धि पाववी दातारा ।।८।। आता वंदू ब्रह्मकुमारी। जिचे नाम वागीश्वरी । पुस्तक वीणा जिचे करी। हंसवाहिनी असे देखा ।।९।। विद्यावेदशास्त्रांसी । अधिकार जाणा शारदेसी । तिये वंदिता विश्वासी । ज्ञान होय अवधारा ।।१०।। म्हणोनि नमितो तुझे चरणी । प्रसन्न व्हावे मज स्वामिणी । राहोनिया माझिये वाणी । ग्रंथी रिघू करी आता ।। ११ ।। गुरुचे नामी तुझी स्थिती । म्हणती नृसिंह सरस्वती । याकारणे मजवरी प्रीती । नाम आपुले म्हणोनि ।।१२।। म्हणोनि नमिले तुझे चरण । व्हावे स्वामिणी प्रसन्न । द्यावे माते विद्यादान । ग्रंथी रिघू करी आता ॥ १३ ॥ आता वंदू त्रिमूर्तिसी । ब्रह्माविष्णुशिवांसी । विद्या मागेन मी तयांसी । अनुक्रमे करोनि ।।१४।। चतुर्मुखे असती ज्यासी । कर्ता जो का सृष्टीसी । वेद झाले ज्याचे मुखेसी । त्याचे चरणी नमन माझे ।।१५।। आता वंदू हृषीकेशी । जो नायक विश्वासी । लक्ष्मीसहीत अहर्निशी । क्षीरसागरी असे जाणा ।।१६।।आता नमू शिवासी। धरिली गंगा मस्तकेसी । पंचवक्त्र दशभुजेसी । अर्धांगी असे जगन्माता ।।१७।। वंदू आता कविकुळासी । पराशरादि व्यासांसी । वाल्मीकादि सकळिकांसी । नमन माझे परियेसा ।।१८।।नेणे कवित्व असे कैसे । म्हणोनि तुम्हां विनवीतसे । ज्ञान द्यावे जी भरवसे । आपुला दास म्हणोनि ।।१९।। न कळे ग्रंथप्रकार । नेणे शास्त्रांचा विचार । भाषा नये महाराष्ट्र । म्हणोनि विनवी तुम्हांसी ।।२०।। समस्त तुम्ही कृपा करणे । माझिया वचना साह्य होणे । शब्दव्युत्पत्तीही नेणे । कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ।।२१।। ऐसे सकळिका ॐ विनवोनि । मग ध्यायिले पूर्वज मनी । उभयपक्ष जनकजननी । महात्म्य पुण्यपुरुषांचे ।।२२।। आपस्तंबशाखेसी । गोत्र कौंडिण्य महाऋषी । साखरे नाम ख्यातीसी । सायंदेवापासाव ।।२३।। नमिता जनकजननीसी । नंतर नमू श्री गुरुसी । झाली मति प्रकाशी। गुरुचरण स्मरावया ।।२४।। गंगाधराचे कुशी । जन्म झाला परियेसी । सदा ध्याय श्रीगुरुसी । एका भावे निरंतर ।।२५।। म्हणोनि सरस्वती गंगाधर । करी संतासी नमस्कार । श्रोतयां विनवी वारंवार। क्षमा करणे बाळकासी ।।२६।। तावन्मात्र माझी मति । नेणे काव्यव्युत्पत्ती । जैसे श्रीगुरु निरोषिति। तेणेपरी सांगतसे ।।२७ ।। पूर्वापार आमचे वंशी । श्रीगुरु प्रसन्न अहर्निशी । निरोप देती माते परियेसी। चरित्र आपुले विस्तारी ।।२८।। श्रीगुरुवाक्य मज कामधेनु । मनी नाही अनुमानु । श्रेयवृध्दी पावविणार आपणु । श्री नृसिंहसरस्वती ।।२९।। त्रैमूर्तीचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर । कवण जाणे याचा पार । चरित्र कवणा न वर्णवे ।।३०।। चरित्र ऐसे श्रीगुरुचे । वर्णावया शक्ति कैची वाचे । आज्ञा असे श्रीगुरुची। म्हणोनि वाचे बोलतसे ।।३१।। ज्यास पुत्रपौत्री चाड । त्यासी हे कथा असे गोड । लक्ष्मी वसे अखंड। तया भुवनी परियेसा ॥३२॥ ऐशी कथा जयांचे घरी । वाचिती नित्य मनोहरी । श्रियायुक्त निरंतरी । नांदती पुत्रकलत्र युक्त ।।३३।। रोग नाही तया भुवनी । सदा संतुष्ट गुरुकृपेकरोनि । नि:संदेह सातां दिनी । ऐकता बंधन तुटे जाणा ।।३४।। निधान लाधे अप्रयासी । तरी का कष्टिजे सायासी। विश्वास माझिया बोलासी । ऐका श्रोते एकचित्ते ।।३५।। आम्हा साक्षी ऐसे घडले । म्हणोनि विनवितसे बळे । श्रीगुरुस्मरण असे भले । अनुभवा हो सकळिक ।।३६ ।। गुरुचरित्र कामधेनु । ऐकता होय महाज्ञानु । श्रोत्र करोनि सावधानु। एकचित्ते परियेसा ॥ ३७ ॥ श्रीनृसिंहसरस्वती । होतेगाणगापुरी ख्याति । महिमा त्यांचा अत्युन्नती । सांगेन ऐका एकचित्ते ।।३८।। तया ग्रामी होते श्रीगुरु । म्हणोनि महिमा असे थोरु । जाणती लोक चहू राष्ट्र । समस्त जाती यात्रेसी ।।३९।। तेथे जावोनि आराधिती । त्वरित होय फलप्राप्ती । पुत्र दारा धन संपत्ति। जे जे इच्छिले होय जना ।।४० ।। लाधोनिया संतान । नाव ठेविती नामकरण । संतोषरूपे येऊन । पावती चारी पुरुषार्थ ।।४१।। ऐसे असता वर्तमानी। भक्त एक 'नामकरणी । कष्टतसे अति गहनी । सदा ध्याये श्रीगुरूसी ॥४२॥ असे मनी व्याकुळित । चिंते वेष्टिला असे बहुत । गुरुदर्शना जाऊ म्हणत । निर्वाणमानसे निघाला ॥४३॥ निर्धार करोनि मानसी । म्हणे पाहीन श्रीगुरुसी । अथवा सांडीन देहासी । जडरुपे काय काज ।।४४।। ज्याचे नामस्मरण करिता। दैन्यहानी होय त्वरिता । आपण तैसा नामांकिता । किंकर म्हणतसे ।।४५।। याचि बोलाचिया हेवा। मनी धरोनि पाहावा । गुरुमूर्तिसी दाखवा । कृपाळुबा सर्वभूती ।।४६।। अतिव्याकुळ अंत:करणी । निंदास्तुती आपुली वाणी । कष्टला भक्त नामकरणी । करिता होय परियेसा ॥४७॥ गुरुची त्रिमूर्ति । म्हणती वेदश्रुति । सांगती दृष्टांती । कलियुगात ॥४८॥ त्रयमूर्तीचे गुण । तू एक निधान । भक्तांसी रक्षण । दयानिधी ।।४९।। अंत:करण स्थिरु । नव्हे बा श्रीगुरु । तू कृपासागरु । पाव वेगी ।।५०।। पाव वेगी आता। नरहरी अनंता । बाळालागी माता । केवी टाकी ।।५१।। तू माता तू पिता । तूचि सखा भ्राता । तूचि कुळदेवता । पारंपरी ।।५२।। सदा कष्ट चित्ता । का हो देसी आता । कृपासिंधु भक्ता । केवी होसी ।।५३।। त्रैमूर्ति तू होसी । पाळिसी विश्वासी। समस्त देवांसी । तूचि दाता ।।५४।। तुजवाचुनि आता। असे कवण दाता। विश्वासी पोषिता । सर्वज्ञ तू ।।५५|| दिलियावाचोनि । न देव म्हणोनि । असेल तुझे मनी। सांग मज ॥५६॥ समस्त महीतळी । तुम्हा दिल्हे बळी । त्याते हो पाताळी । बैसविले ॥५७॥ सृष्टीचा पोषक । तूचि देव एक । तूते मी मशक । काय देऊ ।।५८।। बाळापाशी माता । काय मागे ताता। ऐक श्रीगुरुनाथा। काय देऊ ।।५९।। सेवा घेवोनिया । देणे हे सामान्य । नाम नसे जाण । दातृत्वासी ||६०॥ तळी बावी विहिरी असती भूमिवरी। मेघ तो अंबरी । वर्षतसे ||६१ || मेघाची ही सेवा । न करिता स्वभावा । उदक पूर्ण सर्वां । केवी करी ||६२|| नेणे सेवा कैसी। स्थिर नसे मानसी । माझे वंशोवंशी । तुझे दास ।।६३।। माझ्या पूर्वज वंशी । सेविले तुम्हांसी ।  संग्रह बहुवसी । तुझे चरणी ।।६४।। आता मज जरी । न देसी नरहरी । जिंतोनि व्यवहारी । घेईन जाणा ।।६५।। दिसतसे आता । कठिणता गुरुनाथा । दास मी अंकिता । सनातन ।।६६ || आपुले समान । असेल कवण । तयासवे मन। कठिण किजे ।। ६७|| कठिण किजे हरी । तुवां दैत्यावरी । प्रल्हाद कैवारी। सेवकांसी ॥६८॥ सेवकां- बाळकांसी। करू नये ऐसी । कठिणता परियेसी । बरवे न दिसे ||६९|| बाळक मातेसी । बोले निष्ठुरेसी। अज्ञाने मायेसी । मारी जरी ॥७०॥ माता त्या कुमरासी । कोप न धरी कैशी । आलिंगोनि हर्षी । संबोखी पा ॥ ७१॥ माता हो कोपेसी। बोले बाळकासी । जाऊनि पितयासी । सांगे बाळ ॥७२॥ पिता कोपे जरी। एके अवसरी। माता कृपा करी । संबोखूनि ||७३|| तू माता तू पिता । कोपसी गुरुनाथा । सांगो कवणा आता। क्षमा करी।।७४|| करुणाकरी ऐसे । वानिते तुज पिसे । अजुनि तरी कैसी । कृपा न ये ।।७५।। ऐसे नामांकित । विनविता त्वरित । कृपाळू श्रीगुरुनाथ । आले वेगी ॥७६॥ वत्सालागी धेनु । जैसी ठाकी भुवनु । तैसे श्रीगुरु आपणु । आले जवळी ।।७७।। येताचि गुरु मुनि । वंदी नामकरणी । मस्तक ठेवोनि । चरणयुग्मी ||७८|| हृदयमंदिरात । बैसवोनि व्यक्त । पूजा उपचारित । षोडशविधी ।। ७९ ।। आनंदभरित । झाला नामांकित । हृदयी श्रीगुरुनाथ । स्थिरावला ॥८०॥ भक्तांच्या हृदयात । राहे श्रीगुरुनाथ । संतोष बहुत । सरस्वतीसी ।।८१।। इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः |||| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्री गुरुदेवदत्त ।। ओवीसंख्या - ८१।।


अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त

।।मराठी भावार्थ ।।

अध्याय १ (मराठी भावार्थ) 




 

सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात, ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीस जाण्यासाठी सर्व देवता, साधुसंत, आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. ग्रंथकाराने श्रीगणेश, श्रीसरस्वती, तसेच ब्रह्मा विष्णू महेश त्रयी, इतर सर्व देव सिद्धी, यक्ष, किन्नर, ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे. तसेच श्रीनृसिंहसरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे. गाणगापूरनिवासी श्रीनृसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी, म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक, अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला. प्रवासात त्याने व्याकूळ अंत:करणाने गुरूची करुणा भाकली. परमेश्वर व गुरू एक मानून त्यांची स्तुती केली. त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली.

नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले. वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्रीगुरू आपण होऊन त्याच्याजवळ आले. गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगुलांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. त्यांना आपल्या हृदयमंदिरात स्थान दिले, त्याचप्रमाणे, त्यांची षोड्शोपचारे पूजाही केली.