॥ श्री स्वामी समर्थ ॥

॥ श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा ॥ 


श्री गणेशाय नमः । त्रैमूर्तिराजा गुरु तूचि माझा । कृष्णातिरी वास करोनी वोजा । सुभक्त तेथे करिती आनंदा । ते सूर स्वर्गी पाहती विनोदा ।। १ ।। ऐसा श्रीगुरुचरण ध्यात । जाता भक्त नामांकित । अति श्रमला चालत । राहिला एका वृक्षातळी ||२|| क्षण एक निद्रिस्त । मनी श्रीगुरु चिंतित । कृपानिधी अनंत । दिसे स्वप्नी परियेसा ॥३॥ रूप दिसे सुषुप्तीत । जटाधारी भस्मांकित । व्याघ्रचर्म परिधानित । कांसे पितांबर देखा || ४ || येऊनि योगेश्वरु जवळी । भस्म लाविले कपाळी । आश्वासूनि तया वेळी। अभयकर देतसे ||५|| इतुके देखोनि सुषुमीत । चेतन झाला नामांकित । चारी दिशा अवलोकित । विस्मय करी तये वेळी ॥ ६ ॥ मूर्ति देखिली सुषुप्तीत । तेचि ध्यातसे मनात । पुढे निघाला मार्ग क्रमित । प्रत्यक्ष देखे तैसाचि ||७|| देखोनिया योगीशाते । करिता झाला दंडवत । कृपा भाकी करुणावंत । तारी तारी म्हणतसे ||८|| कृपेने भक्तालागुनि । येणे झाले कोठोनि । तुमचे नाव कवण मुनी । कवण स्थानी वास तुम्हा ||९|| सिद्ध म्हणे आपण योगी । हिंडू तीर्थे भूमि स्वर्गी। प्रसिद्ध आमुचा गुरु जगी । नृसिंहसरस्वती विख्यात ||१०|| त्यांचे स्थान गाणगापुर । अमरजासंगम भीमातीर । त्रयमूर्तीचा अवतार । नृसिंहसरस्वती ॥ ११ ॥ कीर्ति ब्रीद ख्याती । सांगतसे सिद्ध यति । वंशोवंशी करितो भक्ति । कष्ट आम्हां केवी पाहे ।।१२।। तू तारक आम्हांसी । म्हणोनि माते भेटलासी । संहार करोनि संशयासी । निरोपावे स्वामिया ॥१३॥ सिद्ध म्हणे तये वेळी। ऐक शिष्या स्तोममौळी । गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी | भक्तवत्सल परियेसा ॥१४॥ गुरुकृपा होय ज्यास । दैन्य दिसे कैचे त्यास । समस्त देव त्यासी वश्य । कळिकाळासी जिंके नर ।।१५।। त्रयमूर्ती श्रीगुरु । म्हणूनी जाणिजे निर्धारु । देऊ शकेल अखिल वरु । एकाभावे भजावे ।।१६ || एखादे समयी श्रीहरि । अथवा कोपे त्रिपुरारी। राखेल गुरु निर्धारी । आपुले भक्तजनांसी ॥ १७॥ ऐसे ऐकोनि नामकरणी लागे सिद्धाचिया चरणी विनवीतसे कर जोडोनि । मक्तिमाव 1 करोनिया ।। १८ ।। स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो माझे चित्ती । गुरुचि केवी झाले त्रिमूर्ति । ब्रह्मा-विष्णु-महेश्वर ।।१९।। आणीक तुम्ही निरोपिलेती। विष्णु रूद्र जरी कोपती । राखो शके गुरु निश्चिती । गुरु कोपलिया न राखे कोणी ||२०|| हा बोल असे कवणाचा । कवण शास्त्रपुराणीचा। संदेह फेडी गा मनाचा । जेणे मन दृढ होय ||२१|| सिद्ध म्हणे शिष्यासी । तुवा पुसिले आम्हासी । वेदवाक्य-साक्षीसी । सांगेन ऐक एकचित्ते ||२२|| वेद चारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखेकरून । त्याचिपासाव पुराण । अष्टादश विख्यात ||२३|| तया अष्टदशांत । ब्रह्मवाक्य असे ख्यात । पुराण ब्रह्मवैवर्त । प्रख्यात असे त्रिभुवनी ||२४|| ॐ नारायण विष्णुमूर्ति । व्यास झाला द्वापारान्ती । प्रकाश केला हे क्षिती । ब्रह्मवाक्यविस्तार ||२५|| तया व्यासापासुनि । ऐकिजे समस्त ऋषिजनी । तेचि कथा विस्तारोनि । सांगेन ऐका एकचित्ते ||२६|| चतुर्मुख ब्रह्मयासी । कलियुग पुसे हर्षी । गुरुमहिमा विस्तारेसी । ब्रह्मदेवे निरुपिला ||२७|| ब्रह्मदेवे कलियुगासी । सांगे केवी कारणेसी । आद्यंत विस्तारेसी । निरोपिजे स्वामिया ॥ २८ ॥ ऐक शिष्या एकचित्ता । जधी प्रळयो झाला होता । आदिमूर्ति निश्चिता । होता वटपत्रशयनी ||२९|| अव्यक्तमूर्ति नारायण । होता वटपत्रशयन । बुद्धि संभवे चेतन । आणिक सृष्टी रचावया ||३०|| जागृत होवोनि नारायण । बुद्धि संभवे चेतन। कमळ उपजवी नाभीहून । त्र्यैलोक्याचे रचनाघर ।।३१|| तया कमळामधून । उदयो झाला ब्रह्मा आपण । चारी दिशा पाहोन । चतुर्मुख झाला देखा ||३२|| म्हणे ब्रह्मा तये वेळी । समस्तांहूनि आपण बळी । मजहून आणिक स्थूळी । कवण नाही म्हणतसे ||३३|| हासोनिया नारायणु। बोले गाढ शब्दवचनु । आपण असे महाविष्णु । भज म्हणे तया वेळी ।।३४।। देखोनिया श्रीविष्णुसी । नमस्कारी ब्रह्मा हर्षी । स्तुति केली बहुवसी । अनेक काळ परियेसा ||३५|| संतोषोनि नारायण । निरोप दिधला अतिगहन । सृष्टी रची गा म्हणून। आज्ञा दिल्ही तये वेळी ||३६|| ब्रह्मा विनवी विष्णूसी । नेणे सृष्टी रचावयासी । देखिली नाही कैसी। केवी रचू म्हणतसे ॥ ३७॥ ऐकोनि ब्रह्मयाचे वचनु । निरोपी त्यासी महाविष्णु । वेद असती हे घे म्हणोनु । देता झाला तये वेळी ||३८|| सृष्टी रचावयाचा विचार । असे वेदांत सविस्तर । तेणेचि परि रचूनि स्थिर । प्रकाश करी म्हणितले ||३९|| अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे खूण । सृष्टी रचावी तया परी ||४०|| या वेदमार्गे सृष्टीसी । रची गा ब्रह्मया अहर्निशी । म्हणोनि सांगे हृषीकेशी । ब्रह्मा रची सृष्टीते ॥ ४१ ॥ सृष्टी प्रजा अनुक्रमे । विविध स्थावरजंगमे । स्वेदज अंडज नामे । जारज उद्भिज उपजविले ॥४२॥ कृत नेता द्वापार युग । उपजवि मग कलियुग । एक एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी ||४३|| बोलावूनि कृतयुगासी । निरोपी ब्रह्मा परियेसी । तुवा जावोनि भूमीसी । प्रकाश करी आपणाते ||४४ || ऐकोनि ॐ ब्रह्मयाचे वचन । कृतयुग आले संतोषोन । सांगेन त्याचे लक्षण । ऐका श्रोते एकचित्ते ।। ४५ ।। असत्य नेणे कधी वाचे। वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे । यज्ञोपवीत आभरण त्याचे । रुद्राक्षमाळा करकंकणे ||४६ || येणे रूपे युग- कृत । ब्रह्मयासी असे विनवीत । माते तुम्ही निरोप देत । केवी जाऊ भूमीवरी ।।४७|| भूमीवरी मनुष्य लोक । असत्य-निंदा-अपवादक । माते न साहे ते ऐक । कवणेपरी वर्तावे || ४८|| ऐकोनि सत्ययुगाचे वचन । निरोपी तो ब्रह्मा आपण । तुवा वर्तावे सत्वगुण । क्वचित्काळ येणेपरी ।। ४९ ।। वर्तता येणेपरी ऐका । झाली अवधी सत्याधिका। बोलावूनि त्रेतायुगाते, विवेका। निरोपी ब्रह्मा परियेसा ॥ ५० ॥ त्रेतायुगाचे लक्षण । ऐक शिष्यां सांगेन। असे त्याची स्थूल तन । हाती असे यज्ञसामग्री ।। ५१|| त्रेतायुगाचे कारण। यज्ञ करिती सकळ जन । धर्मशास्त्र प्रवर्तन । कर्ममार्ग ब्राह्मणांसी || ५२|| हाती देखा कुशसमिधा असे । धर्मप्रवर्तक सदा वसे । ऐसे युग गेले हर्षे। निरोप घेउनि भूमीवरी ।। ५३ ।। बोलावूनि ब्रह्मा हर्षी । निरोप देती द्वापारासी । सांगेन तयाचे रूपासी। ऐका श्रोते एकचित्ते ।।५४।। खड्ग खट्वांग धरोनी हाती । धनुष्य बाण येरा हाती ।लक्ष्य उग्र असे शांती । निष्ठुर दया दोनी असे || ५५ || पुण्य पाप समान देखा । स्वरूपे द्वापार ऐसा निका । निरोप घेउनि कौतुका। आला आपण भूमीवरी || ५६ || त्याचे दिवस पुरल्यावरी । कलियुगाते पाचारी । जावे त्वरित भूमीवरी । म्हणोनि सांगे ब्रह्मा देखा ।।५७|| ऐसे कलियुग देखा। सांगेन लक्षणे ऐका । ब्रह्मयाचे सन्मुखा । केवी गेले परियेसा || १८ || विचारहिन अंत:करणी । पिशाचासारखे वदनी । तोंड खालते करूनी । ठायी ठायी पडतसे ।। ५९ ।। वृद्ध आपण विरागहीन । कलह द्वेष सवे घेऊन । वाम हाती धरुनी शिव । ॐ येत ब्रह्मयासन्मुख ||६०|| जिव्हा धरोनि उजवे हाती । नाचे कलि अतिप्रिती । दोषोत्तरे करिस्तुती । पुण्यपापसंमिश्रित ||६१ || हासे रडे वाकुल्या दावी । वाकुडे तोंड मुखे शिवी । ब्रह्मयापुढे उभा राही । काय निरोप म्हणूनी ||६२|| देखोनि तयाचे लक्षण । ब्रह्मा हासे अतिगहन । पुसतसे अति विनोदाने । लिंग जिव्हा का धरिली ||६३॥ कलियुग म्हणे ब्रह्मयासी। जिंकीन समस्त लोकांसी। लिंग जिव्हा रक्षणारांसी। हारी असे आपणाते ||६४ || ऐकोन कलीचे वचन । निरोप देतो ब्रह्मा आपण । भूमीवरी जाऊन । आपुले गुण प्रकाशी ||६५|| ब्रह्मा सांगे कलियुगासी । सांगेन तुज उपदेशी । तुझ्या युगी आयुष्य नरासी । स्वल्प असे एक शत ।। ६६ ।। पूर्व युगायुगी देखा। आयुष्य बहु मनुष्यलोकां । तप अनुष्ठान ऐका । करिती अनेक दिवसवरी ||६७॥ मग होय तयांसी गति । आयुष्य असे अखंडिती । याकारणे कष्टती क्षिती । बहु दिवसपर्यंत || ६८ ।। आता ऐसे नव्हे जाण । स्वल्प आयु मनुष्यपण । करिती तप अनुष्ठान । शीघ्र पावती परमार्था ||६९ || जे जन असतील ब्रह्मज्ञानी । पुण्य करिती जाणोनि । त्यांसी तुवा साह्य होवोनि । वर्तत असे म्हणे ब्रह्मा ॥७०॥ ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । कली म्हणतसे नमून। स्वामींनी निरोपिले जे जन । तेचि माझे वैरी असती ।। ७१ ।। काळात्म्याचे ऐसे गुण | छेदन करील धर्मवासना । पुण्यात्म्याचे अंतःकरणा । उपजेल बुद्धि पापाविषयी ।। ७२ ।। कलीचे वचन ऐकोनि । ब्रह्मा हासे अतिगहनी । सांगतसे विस्तारोनि । उपाय कलीसी रहाटावया ॥ ७३ ॥काळ वेळ असती दोनी । तुज साह्य होऊनि । येत असती निर्गुणी । तेचि दाविती तुज मार्ग ||७४ || निर्मळ असती जे जन । तेचि वैरी तुझे जाण । मळमूत्रे वेष्टीले जन । तुझे इष्ट परियेसी ।।७५।। याचिकारणे पापपुण्यासी। विरोध असे परियेसी । जे अधिक पुण्यराशी । तेचि जिंकीती तुज ।। ७६ ।। या कलियुगाभीतरी । जन होतील येणेपरी। जे जन साहतील तुझी क्रूरी । तेचि ईश्वरी ऐक्य होती ।।७७|| ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । कलियुग करितसे प्रश्न । कैसे साधूचे अंत:करण । कवण असे निरोपावे ।। ७८ ।। ब्रह्मा म्हणे तये वेळी। एकचित्ते ऐक कली । सांगेन ऐका श्रोते सकळी । सिद्ध म्हणे शिष्यासी ।। ७९ ।। धैर्य धरोनि अंतःकरण। शुद्ध बुद्धि वर्तती जन । दोष न लागती कधी जाण । लोभवर्जित नरांसी ||८०|| मातापितासेवकांसी । अथवा सेवी ब्राह्मणासी । गायत्री कपिला धेनूसी । भजणारांसी दोष न लगे तुझा ।। ८१ ।। वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी । आज्ञा माझी आहे ऐसी । तयांसी बाधू नको ॥। ८२ ।। गुरुसेवक असती नर । पुराण श्रवण करणार । सर्वसाधनधर्मपर । त्यांसी तू बाधो नको || ८३ || कलि विनवी ब्रह्मयासी । गुरु शब्द आहे कैसी । कवण गुरुस्वरूप कैसी । विस्तारावे मजप्रती ॥ ८४ ॥| ऐकोनि कलीचे वचन । ब्रह्मा सांगतसे आपण । गकार म्हणजे सिद्ध जाण । रेफः पापस्य दाहकः ।। ८५ ।। उकार विष्णु अव्यक्त । ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित । त्रिगुणात्मक श्रीगुरु सत्य । म्हणोनि सांगे कलीसी ॥८६॥ गुरु पिता, गुरु माता। गुरु शंकरु निश्चिता। ईश्वरु होय जरी कोपता । गुरु रक्षील परियेसा ॥ ८७॥ गुरु कोपेल एखाद्यासी । ईश्वर न राखे परियेसी । ईश्वरु कोपेल जरी त्यासी । श्रीगुरु राखेल निश्चित ||८८ || गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः । गुरुरेवः परंतत्त्वं तस्माद् गुरुमुपाश्रयेत || ८९ || गुरु ब्रह्मा सत्य जाण । तोचि रुद्र महाविष्णु। गुरुचि ब्रह्मकारण । म्हणोनि गुरु आश्रयावा ।। ९० ।। याकारणे श्रीगुरुसी । भजावे शास्त्रमार्ग ऐसी । तीर्थव्रतयोगतपासी । ज्योति:स्वरुप असे जाणा ॥ ९१ ॥ गुरु सेविता सर्व सिद्धि । होती परियेसी सर्वऋद्धि । कथा वर्तली अनादि । अपूर्व तुज सांगेन ।। ९२ ।।पूर्वी गोदावरीचे तीरी । आंगिरस ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष असती नानापरी । पुण्यनाभी मृग वसती ॥९३॥ ब्रह्मऋषी आदिकरोनी । तप करिती तया स्थानी । तयांत वेदधर्म म्हणोनि । पैलपुत्र होता द्विज ||१४|| तया शिष्य बहु असती । वेदशास्त्र अभ्यासिती । त्यांत दीपक म्हणिजे ख्याती । शिष्य होता परियेसा ॥९५॥ होता शिष्य गुरुपरायण । केला अभ्यास शास्त्रपुराण । झाला असे अतिनिपुण । तया गुरुसेवा करिता ||१६|| वेदधर्म एके दिनी । समस्त शिष्यांसी बोलावुनी । पुसतसे संतोषोनि । ऐका श्रोते सकळजन ||१७|| बोलावूनी शिष्यांसी । म्हणे गुरु परियेसी । प्रीति असेल जरी तुम्हासी । तरी माझे वाक्य परिसावे ||१८|| शिष्य म्हणती गुरुसी । जे जे स्वामी निरोप देसी। अंगीकारू भरवंसी । आम्हांसी तू तारक ||१९|| ऐकोनि शिष्यांचे वचनी । संतोष झाला वेदधर्म मुनी । संदीपकाते बोलावूनी । सांगतसे परियेसा ॥। १०० ।। ऐका हो शिष्य सकळिक । आमचे पूर्वार्जित असे एक। जन्मांतरी सहस्राधिक। केली होती महापातके ।। १०१ ।। आमुचे अनुष्ठान करिता । बहुत गेले प्रक्षालिता । काही असे शेष आता। भोगिल्यावाचूनि न सुटे जाणा ।। १०२ ।। तपसामर्थ्य जरी उपेक्षा करित । तरी पाप मोक्षासी आड रिघत । याचि कारणे निष्कृति करित । तया पाप घोरासी ।। १०३ || न भोगिता आपुले देही। आपुले पापा निष्कृति नाही । हे निश्चित करोनि पाही । भोगावे आम्ही परियेसा ॥ १०४ ॥ या पापाचे निष्कृतीसी । जावे आम्ही वाराणशीसी । जाईल पाप शिघ्रतेसी । प्रख्यात असे अखिल शास्त्री ।। १०५ ।। याकारणे आपणासी । न्यावे वाराणशी पुरीसी । पाप भोगीन स्वदेहासी । माते तुम्ही सांभाळावे ।। १०६ ।। या समस्त शिष्यांत । कवणा असेल सामर्थ्य | अंगीकारावे त्वरित । म्हणोनि पुसे शिष्यांसी ।। १०७ ।। या शिष्यांमध्ये एक । नाम असे संदीपक । बोलतसे अतिविवेक । तया गुरुप्रति देखा ।। १०८॥ दीपक म्हणे श्रीगुरुसी । पाप करिता देह नाशी । न करावा संग्रहो दुःखासी । शीघ्र करावा प्रतिकारू ।। १०९ ।। वेदधर्म म्हणे तयासी । दृढ-देह असता मनुष्यासी । क्षालन करावे पापासी । अथवा वाढे विषापरी ।। ११० ।।अथवा तीर्थे प्रायश्चित । आपुले देही भोगोनि त्वरित । पापावेगळे न होता निरुते । मुक्ति नव्हे आपणासी ।। १११।। दीपक म्हणे गुरुसी । स्वामी निरोपावे आपणासी । सेवा करीन स्वशक्तीसी । न करिता अनुमान, सांगिजे ।। ११२ ।। ऐकोनि दीपकाचे वचन । वेदधर्म म्हणे आपण कुष्ठी होईन अंगहीन । अंध पांगुळ परियेसा ॥। ११३ ।। संवत्सर एकविंशत। माते सांभाळावे बहुत । जरी असेल दृढ-व्रत । तरीच अंगीकार करावा ।। ११४ || दीपक म्हणे गुरुसी । कुष्ठी होईन आपण हर्षी । अंध होईन एकवीस वर्षी पापनिष्कृति करीन ।। ११५|| तुमचे पापाचे निष्कृति । मी करीन निश्चिती। स्वामी निरोपावे त्वरिती । म्हणोनि चरणी लागला ।।११६ || ऐकोनि शिष्याचे वचन | संतोषला वेदधर्म मुनि आपण । सांगतसे विस्तारोन। लक्षण तया पापाचे ।। ११७|| आपुले पाप आपणासी । ग्राह्य नोहे पुत्रशिष्यांसी । न भोगिता स्वदेहासी । नवचे पाप परियेसा ||११८।। याकारणे आपण देखा । भोगीन आपुले पापदुःखा । आम्हांसी सांभाळी तू दीपका । एकवीस वर्षेपर्यंत ।। ११९ ।। जे पीडिती रोगे देखा | प्रतिपाळणारासी कष्ट अधिका। मजहूनि संदीपका । तुज कष्ट अधिक जाण ॥ १२० ॥ याकारणे आपुले देही। भोगीन पाप निश्चयी । तुवा प्रतिपाळावे पाही । काशीपुरी नेऊनिया ।। १२१ ।। तया काशीपुरी जाण । पापावेगळा होईन । आपण शाश्वतपद पावेन । तुजकरिता शिष्योत्तमा ।। १२२ ।। दीपक म्हणे श्रीगुरुसी । अवश्य नेईन पुरी काशी। सेवा करीन एकवीस वर्षी। विश्वनाथासम तुमची ॥ १२३ ॥ ब्रह्मा म्हणे कलीसी । शिष्य होता कैसा त्यासी । कुष्ठ होताचि गुरुसी । नेले काशीपुराप्रति । । १२४ ॥ मणिकर्णिका उत्तरदेशी । कंबळेश्वर-संनिधेसी। राहिले तेथे परियेसी । गुरु शिष्य दोघेजण || १२५ || स्नान करुनि मणिकर्णिकेसी । पूजा करिती विश्वनाथासी । प्रारब्धभोग त्या गुरुसी । भोगीत होता तया स्थानी ।। १२६ ।। कुष्ठरोगे व्यापिले बहुत । अक्षहीन अति दुःखित । संदीपक सेवा करित । अतिभक्तीकरूनि ||१२७|| भिक्षा मागोनि संदीपक । गुरुसी आणोनि देत नित्यक । करी पूजा भावे एक । विश्वनाथस्वरूप म्हणत || १२८ ।। भिक्षा आणिता एकेदिनी । न जेवी श्रीगुरु कोपोनी । स्वल्प आणिले म्हणोनी क्लेशे सांडोनि देत भूमिवरी ।। १२९।। येरे दिवशी जाऊनि शिष्य । आणी अन्न बहुवस । मिष्टान्न नाणिसी म्हणोनि क्लेश । करिता झाला परियेसा ॥ १३० ॥ तितुकेही आणी मागोनिया । सर्वस्व करितसे वाया । कोपे देतसे शिविया । परोपरी परियेसा ॥। १३१ ।। एखादे समयी शिष्यासी । म्हणे ताता ज्ञानराशी । मजनिमित्त कष्टलासी । शिष्योत्तमाशिखामणी || १३२|| सवेचि म्हणे पापी क्रूरा। माते गांजिले अपारा। पू-मांस विष्ठामूत्रा । क्षणक्षणा धूत नाही || १३३ || पाप जेथे असे बहुत । दैन्य मत्सरसहित वसत। शुभाशुभ नेणे क्वचित । पापरूप ते जाणावे ।। १३४ ॥ समस्त रोग असती देखा । कुष्ठ-सोळा भाग नव्हती का । वेदधर्म द्विजु ऐका । कष्टतसे येणेपरी ।। १३५ ।। ऐसे गुरुचे गुणदोष । मनी ना आणी तो शिष्य । सेवा करी एकमानस । तोचि ईश्वर म्हणोनि ।। १३६ ।। जैसेजैसे मागे अन्न । आणून देतो परिपूर्ण। जैसा ईश्वर असे विष्णु। तैसा गुरु म्हणतसे ||१३७।। काशीसारखे क्षेत्र असता । कदा न करी तीर्थयात्रा। न वचे देवाचिये यात्रा । गुरुसेवेवाचूनि ।। १३८ || गुरु बोले निष्ठुरेसी । आपण मनी संतोषी । जे जे त्याचे मानसी । पाहिजे तैसा वर्ततसे ।। १३९ ।। वर्तता येणेपरी देख । प्रसन्न होवोनि पिनाक । येवोनि उभा सन्मुख । वर माग म्हणतसे ।। १४०|| अरे गुरुभक्ता दीपका । महाज्ञानी कुलदीपका । तुष्टलो तुझे भक्तीसी निका । प्रसन्न झालो माग आता ।। १४१ ।। दीपक म्हणे ईश्वरासी । हे मृत्युंजय व्योमकेशी । न पुसता आपण गुरुसी । वर न घे परियेसा || १४२|| म्हणोनि गेला गुरुपाशी । विनवीतसे तयासी । विश्वनाथ आम्हासी । प्रसन्न होउनि आलासे ।। १४३ ।। निरोप झालिया स्वामीचा । मागेन उपशम व्याधीचा । वर होता सदाशिवाचा । होईल बरवे तुम्हांसी ।। १४४|| ऐकोनि शिष्याचे वचन । बोले गुरु कोपोन । माझे व्याधीनिमित्त जाण । नको प्रार्थ ईश्वरासी ।। १४५|| भोगिल्यावाचोनि पातकासी । निवृत्ति नव्हे गा परियेसी । जन्मांतरी बाधिती ऐसी। धर्मशास्त्री असे जाण || १४६ || ऐसेपरी शिष्यासी। गुरु सांगे परियेसी । निरोप पुसोनि श्रीगुरुसी ।गेला ईश्वरासन्मुख ।।१४७।। जाऊनि म्हणे ईश्वरासी । नलगे वर आपणासी । नये गुरुचे मानसी । केवी घेऊ म्हणतसे ।। १४८।। विस्मय करोनि व्योमकेशी । गेला निर्वाण मठापासी । बोलावून समस्त देवांसी । सांगे वृत्तांत विष्णूपुढे ।। १४९ ।। श्रीविष्णु म्हणे शंकरास। कैसा गुरु कैसा शिष्य । कोठे त्यांचा असे वास। सांगावे मज प्रकाशोनि ।।१५०।। सांगे ईश्वर विष्णूसी । आश्चर्य देखिले परियेसी । दीपक म्हणिजे बाळ कैसी । गुरुभक्ती करितो अभिनव ।। १५१ ।। गोदावरीतीरवासी। वेदधर्म म्हणिजे तापसी । त्याची सेवा अहर्निशी । करितो भावे एकचित्ते ।।१५२।। वर देऊ म्हणोनि आपण । गेलो होतो तयापाशी जाण । गुरुचा निरोप नाही म्हणोन । न घे वर परियेसा ||१५३|| तैसे तापसी योगियांसी । नव्हे मन वर द्यावयासी । बलात्कारे देता कैसी । वर न घे तो दीपक ।। १५४|| तनमन गुरुसी समर्पूनि । सेवा करितो संतोषोनि । त्रिमूर्ति गुरुचि म्हणोनि । निश्चय केला मानसी देखा ।। १५५।। समस्त देव माता पिता । गुरुचि होय ऐसे म्हणता । निश्चय केला असे चित्ता । गुरु परमात्मा म्हणोनि ।। १५६ || इतुके ऐकोनि शार्ङ्गधरु | पहावया गेला शिष्य-गुरू । त्यांचा भक्तिप्रकारु । पाहता झाला तये वेळी ।। १५७।। सांगितले होते विश्वनाथे । अधिकत्व दिसे आणिक बहुते । संतोषोनि दीपकाते । म्हणे विष्णु परियेसा ।। १५८।। बोलावूनि दीपकासी । म्हणतसे हृषीकेशी । तुष्टलो तुझ्या भक्तीसी । वर माग म्हणतसे ।। १५९।। दीपक म्हणे विष्णूसी । काय भक्ति देखोनि आम्हांसी । वर देसी परियेसी । कवण कार्या सांग मज || १६० ।। मी तर तुज भजत नाही । तुझे नाम स्मरत नाही । बलात्कारे येवोनि पाही । केवी देसी वर मज ।। १६१ | ऐकोनि दीपकाचे वचन । संतोषी जाहला महाविष्णु। सांगतसे विस्तारोनु । तया दीपकाप्रती देखा ।। १६२।। गुरुभक्ति करिसी निर्वाणेसी । म्हणोनि जाहलो संतोषी । जे भक्ति केली गुरुसी । तेचि आम्हासी पावली || १६३|| सेवा करिता मातापिता । ती पावे मज तत्त्वता । पतिसेवा स्त्रिया करिता । तेचि मज पावतसे ॥। १६४ ।। ऐसे ऐकोनि दीपक । नमिता झाला आणिक । विनवीतसे ऐक ।सिद्ध म्हणे द्विजासी ।। १६५ ।। ऐक विष्णु हृषीकेशी । निश्चय असे माझे मानसी । वेदशास्त्रादिमीमांसी । गुरु आम्हांसी देणार ।। १६६ ।। गुरुपासूनि सर्व ज्ञान । त्रयमूर्ति होती आम्हां स्वाधीन । आमुचा देव गुरुचि जाण । अन्यथा नाही आपणासी ।। १६७।। सर्व देव सर्व तीर्थ । गुरुचि आम्हां असे सत्य । त्याचेनि आम्हां परमार्थ । केवी दूर असे सांग ।। १६८ ।। जो वर द्याल तुम्ही मज । श्रीगुरु देतो काय चोज । याकारणे श्रीगुरुराज । भजतसे परियेसा ॥। १६९|| संतोषोनि महाविष्णु । म्हणे धन्य धन्य माझा प्राणु । तूचि शिष्य शिरोरत्न । भोळा भक्त तूचि माझा ।। १७०।। काही तरी माग आता । वर देईन तत्त्वता । विश्वनाथ आला होता । दुसरेन आलो आपण देखा ।। १७१ ।। दीपक म्हणे विष्णूसी । जरी वर आम्हां देसी । गुरुभक्ति अधिक होय मानसी । तैसे ज्ञान मज द्यावे ||१७२ || गुरुस्वरुप आपण ओळखे । तैसे ज्ञान देई सुखे । यापरते न मागे आणिके । म्हणोनि चरणी लागला ||१७३।। दिधला वर शार्ङ्गपाणी । संतोषोनि बोले वाणी । अरे दीपका शिष्यशिरोमणी । माझा प्राणसखा होसी ।। १७४।। तुवा ओळखिले गुरुसी । देखिले दृष्टी परब्रह्मासी । आणीक जरी आम्हां पुससी। सांगेन ऐका एकचित्ते ।। १७५|| जे जे समयी श्रीगुरुसी । तू भक्तीने स्तुति करिसी । तेणे आम्ही होऊ संतोषी । तेचि आमुची स्तुति जाण ।। १७६ ।। वेद वाचिती सांगेसी । वेदान्त-भाष्य अहर्निशी । वाचिती जन भक्तीसी । आम्हां पावे निर्धारी ।। १७७|| बोलती वेद सिद्धांत । गुरुचि ब्रह्मा ऐसे म्हणत । याचिकारणे गुरु भजता सत्य । सर्व देव तुज वश्य ॥ १७८॥ गुरु म्हणजे अक्षरे दोन । अमृताचा समुद्र जाण । तयामध्ये बुडताचि क्षण । केवी होय परियेसा ।। १७९ || जयाचे हृदयी श्रीगुरुस्मरण । तोचि त्र्यैलोक्यी पूज्य जाण । अमृतपान सदा सगुण । तोचि शिष्य अमर होय ।। १८०।। आपण अथवा ईश्वरु । ब्रह्मा देत जो का वरू । फलप्राप्ति होय गुरु । गुरु त्रिमूर्ति याचकारणे ।। १८१ ।। ऐसा वर दीपकासी । दिधला विष्णूने परियेसी । ब्रह्मा सांगतसे कलीसी । एकचित्ते परियेसा ॥। १८२ ।। वर लाधोनिया दीपक । गेला गुरुचे सन्मुख । पुसतसेगुरु ऐक। तया शिष्या दीपकासी ।। १८३ ।। ऐक शिष्या कुळदीपका । काय दिधले वैकुंठनायका । विस्तारोनि सांग निका । माझे मन स्थिर होय ।।१८४।। दीपक म्हणे गुरुसी । वर दिधला हृषीकेशी । म्या मागितले ऐसी । गुरुभक्ति व्हावी म्हणोनि ।। १८५ ।। गुरुची सेवा तत्परेसी । अंत:करणी दृढ शुद्ध ऐसी । वर दिधला संतोषी । दृढभक्ति तुमचे चरणी ।। १८६ ।। संतोषोनि तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू । जीविते तू होय स्थिरू। काशीपुरी वास करी ।। १८७।। तुझे वाक्य सर्वसिद्धि । तुझे द्वारी नवनिधि । विश्वनाथ तुझे स्वाधी । म्हणे गुरु संतोषे ।। १८८ ।। येणेपरी शिष्यासी । प्रसन्न झाला परियेसी । दिव्यदेह तत्क्षणेसी । झाला गुरु वेदधर्म ।। १८९ ।। भाव शिष्याचा पहावयास । कुष्ठी झाला महाक्लेश । तो तापसी अतिविशेष । त्यासी कैचे पाप राहे ।। १९०।। लोकानुग्रह करावयासी । गेला होता पुरी काशी । काशीक्षेत्रमहिमा आहे ऐसी । पाप जाय सहस्रजन्मीचे ।।१९१ ।। सिद्ध म्हणे नामकरणी । दृढ मन असावे याचि गुणी । तरीच तरेल भवार्णी । गुरुभक्ति असे येणेविधि ।।१९२।। दृढ भक्ति असे जयापाशी । त्रिकरणसह मानसी । तोचि लाधे ईश्वरासी । ईश्वर होय तया वश्य ।। १९३ || गंगाधराचा नंदन । करीतसे श्रोतया नमन । न म्हणावे न्यून पूर्ण । माझे बोबडे बोलांसी । । १९४ ।। इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथा-कल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्री गुरुदेवदत्त ।। 
ओवीसंख्या - १९४॥

 

मराठी भावार्थ 


पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. तेथे वसिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत. त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र 'वेद्धर्म' नावाचा एक विप्र होता. त्याला अनेक शिष्य होते.' त्यापैकी 'दीपक' नावाचा एक शिष्य होता. तो शिष्य मोठा गुरुभक्त होता. शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला. एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, "शिष्यांनो, माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे, मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेले आहे. अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पाप धुऊन गेले आहे. परंतु त्यापैकी ।। १२ ।।

काही अजून उरले आहे. ते माझे मलाच भोगायला लागणार आहे त्याशिवाय ते संपणार नाही. मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते. तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निरास होणार नाही. त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे. तेथे गेल्यास पापाचे शीघ्र क्षालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे. त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हांपैकी कोण तयार आहे, त्याने ही जबाबदारी स्वीकारावी."

त्या शिष्यातून 'दीपक' लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला, "स्वामी, आपण मला आज्ञा करावी. मी आपली कशी सेवा करावी ते मला निःसंकोचपणे सांगावे. काया, वाचा, मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो. मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे, तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी." दीपकाचे वचन ऐकून वेधर्म दीपकाला म्हणाले, "दीपका, माझे भोग मलाच भोगावे लागतील ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीत. मी केलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला, आंधळा, ॐ पांगळा असा होईन. हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत. तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल. तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा! मी शाश्वत पदास पोचू शकेन."

काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंबळेश्वर तीर्थाजवळ ते गुरु-शिष्य राहिले. तेथे वेद्धर्मास कुष्ठरोग झाला. गुरूला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरूची अत्यंत मनोभावे सेवा केली. गलितगात्र व चिडखोर झालेल्या गुरूच्या सर्व लहरी व केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्याची सेवा केली.

दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. 'तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरूची व्याधी नष्ट करतो. असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले. परंतु गुरूची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले. भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले. त्यांनी श्रीविष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली. त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले. दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले. दीपकाने 'अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरूची सेवा अधिक चांगली करता येईल.' असा वर मागितला. श्रीविष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले. नंतर दीपक गुरूजवळ गेला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले, 'भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे.' दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकिकत सांगितली.

वेद्धर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला "तू दीर्घायुषी होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील" असा आशीर्वाद दिला. याप्रमाणे वेधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याचक्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला.